मालवण, प्रतिनिधी :
मालवण शहरातील मेढा परिसरात लोखंडी वीजपोलामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून दोन गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. मृत गायींपैकी एक गाय गाभण असल्याची माहिती असून, या घटनेमुळे महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेढा येथील शंकर मंदिराजवळील रस्त्यावर मॉन्टी तारी यांच्या घराशेजारी असलेल्या लोखंडी वीजपोलाजवळून दोन गायी जात असताना पोलामध्ये विद्युत प्रवाह असल्याने दोन्ही गायींना जोरदार शॉक बसला. या दुर्घटनेत दोन्ही गायी जागीच मृत्युमुखी पडल्या.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका मेघा सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महावितरणला कळविले. त्यानंतर संबंधित भागातील वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली.
यावेळी स्थानिक नागरिक आणि नगरसेविका मेघा सावंत यांनी मृत गायींच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मालकाचा शोध लागला नाही. त्यानंतर नगरसेविका मेघा सावंत यांनी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मृत गायींच्या दफनासंदर्भात आवश्यक परवानगी घेतली.
यानंतर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने गायींचे मृतदेह ट्रॅक्टरमध्ये भरून त्यांचे नियमानुसार दफन करण्यात आले.
या कामात नगरपालिकेचे स्वच्छता मुकादम आनंद वळंजू, बाळकृष्ण जाधव, स्वच्छता कर्मचारी जगन्नाथ पिंगुळकर, सदाशिव मालवणकर, महेश कोळंबकर, पवन धुरी, ट्रॅक्टर चालक मंदार तांडेल, जेसीबी चालक रवी राठोड तसेच राजेश तारी, प्रसाद मोंडकर, लीलाधर ढवळे, राजू डिंगणकर, राजेश वाघ, विशाल आचरेकर, मॉन्टी तारी, दिलीप आचरेकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.
दरम्यान, वीजपोलामध्ये विद्युत प्रवाह कसा उतरला, याची चौकशी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






