मालवण, प्रतिनिधी :
मालवण ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेला बळकटी देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ अशा दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याअंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात पदभार स्वीकारत रुग्णसेवेला सुरुवात केली. यानिमित्त नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. प्रशांत बागडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील नऊ वर्षांचा अनुभव असून त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथून आपल्या सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर मुंबईतील सायन रुग्णालय आणि सोलापूर येथील महिला रुग्णालयात त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मालवण आणि परिसरातील महिलांना दर्जेदार स्त्रीरोग उपचारांची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन मतदारसंघातील आरोग्यस्थितीचा अहवाल सादर केला होता. तसेच ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तातडीने उपाययोजना करत शासनाने डॉ. प्रशांत बागडे यांची मालवण ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती केली आहे.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, महेश कांदळगांवकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, निना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, शिवसेना तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, मार्टीन फर्नांडिस, लुड्डीन फर्नांडिस तसेच भाजपच्या पूजा वेरलकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण, अमृता फाटक, संतोषी कांदळगांवकर, दिव्या कोचरेकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.







