मालवण, प्रतिनिधी :
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा मालवणच्या महिला विभागातर्फे स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘संगीत स्वराशा’ या सुरेल संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आचरा येथील डॅफोडिल्स रिसॉर्टमध्ये आयोजित या संगीत सोहळ्यात आशाताईंच्या अजरामर गीतांनी वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाचा शुभारंभ पुणे येथील ज्येष्ठ बासरीवादक विजयराव देसाई यांनी आशा भोसले यांची आवडती चैती लोकधून बासरीवर सादर करून केला. त्यांच्या सुरेल वादनाने कार्यक्रमाला आगळीवेगळी सुरुवात मिळाली.
कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दहा गायिकांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. रश्मी आंगणे, स्मिता हडकर, अर्चना जोशी, ऋतावरी वळंजू, वंदना राणे, वर्षाराणी अभ्यंकर, आदिती मसुरकर, देवयानी आजगावकर, श्रावणी प्रभू आणि स्वराशा कासले यांनी आशा भोसले यांच्या गाजलेल्या गीतांना आपल्या मधुर स्वरांनी उजाळा देत संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा कदम यांनी प्रभावीपणे केले. तर मंदार सांबारी यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या काव्यरूप प्रतिक्रियेतून कार्यक्रमाचे कौतुक करत उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या भारतीय संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल समस्त रसिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या गीतांनी अनेक पिढ्यांना समृद्ध केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला कोमसाप जिल्हा संघटक रुजारिओ पिंटो, माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माजी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, सरपंच जेरॉन फर्नांडिस, सुनंदा कांबळे, अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, निलेश सरजोशी, सदानंद कांबळी, सुरेश गावकर, विजय चौकेकर, पांडुरंग कोचरेकर, गुरुनाथ ताम्हणकर, सुरेंद्र सकपाळ, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे, मनाली फाटक, रमाकांत शेटये, महादेव बागडे, प्रकाश पेडणेकर, चंद्रशेखर धानजी, विनोद कदम, सायली परब, नेहा बापट, उज्वला धानजी, मधुरा माणगावकर यांच्यासह कोमसापचे सदस्य आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.






