स्मार्ट मीटरनंतर वाढीव वीजबिलांबाबत तक्रारी; जीर्ण वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचीही मागणी
मालवण | प्रतिनिधी
नवीन स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारींसह मालवण तालुक्यातील विविध वीज समस्यांबाबत युवासेनेने महावितरण अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम सुधीर साळसकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मालवण वीज वितरण कार्यालयात भेट देऊन ग्राहकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, उपविधानसभा प्रमुख संकेत राऊळ, जिल्हा सचिव राहुल बागवे, मालवण तालुकाप्रमुख अभी लाड, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, निकीत वराडकर, तालुका सचिव तथागत मालवणकर, योगेश कामतेकर, आचरा विभाग प्रमुख उमेश सावंत, अमोल मुळीक, मंगेश साळसकर, संदीप राणे, शाम घाडी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वीइतकाच वीज वापर असूनही ग्राहकांना वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम, आर्थिक ताण आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे युवासेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
याशिवाय मालवण शहर आणि किनारपट्टी भागातील अनेक वीज खांब, वीज तारा व इतर विद्युत साहित्य जीर्ण झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी वीज तारा तुटून पडण्याच्या घटनाही घडत असल्याने संपूर्ण सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इन्सुलेटेड वीज तारा बसविण्याची मागणीही करण्यात आली.
युवासेनेने उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन मेहत्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.







