३ ऑगस्ट रोजी दैवज्ञ भवन येथे सामाजिक उपक्रम; नागरिकांना सहभागाचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी
मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक तथा लायन्स क्लबचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राजकोट मित्रमंडळाच्या वतीने सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत दैवज्ञ भवन येथे भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील रक्ताचा तुटवडा कमी करून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने या संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान करा, जीवनदान द्या” हा संदेश देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी परिसरातील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच आवश्यक मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राजकोट मित्रमंडळाच्या वतीने सर्व नागरिक, युवक-युवती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे तसेच मोफत नेत्र तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







