‘सेव्ह एज्युकेशन, सेव्ह नेशन’ची भूमिका; शिक्षणातील पारदर्शकतेची मागणी
मालवण | प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुकटे यांना संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे आणि महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) राज्य प्रतिनिधी अशोक गिते यांनी प्रत्यक्ष भेटून सादर केले.
यावेळी ‘Save Education, Save Nation’ या भूमिकेचा पुनरुच्चार करत शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी संघटना कायम कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रात वाढत्या पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि अन्य गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
निवेदनाद्वारे केंद्र शासनाने शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि इतर गंभीर समस्यांवर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी ठोस धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुकटे यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.







