विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता आणि डिजिटल जबाबदारीचे धडे
मालवण | प्रतिनिधी
मालवण येथील स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने टेलिकॉम सायबर अवेअरनेस कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे वक्ते शामजीभाई पटेल उपस्थित होते. तसेच बी. के. वर्षा, अशोक सडवेलकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. अन्वेषा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य कैलास राबते यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर प्रास्ताविक प्रा. अन्वेषा कदम यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शक शामजीभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रकार, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, ओटीपी, पासवर्ड आणि वैयक्तिक माहितीची गोपनीयता, तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे प्रभावी उपाय याबाबत उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमास प्रा. धामापूरकर आणि प्रा. मिलन सामंत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा बर्वे यांनी केले, तर प्रा. मिलन सामंत यांनी आभार मानले.







