‘नगरसेविका आपल्या दारी’ उपक्रमातून मतदार पडताळणीला गती
मालवण | प्रतिनिधी
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्पडताळणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत मालवण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगरसेविका तथा स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) यांना सहकार्य करत ‘नगरसेविका आपल्या दारी’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना एसआयआर फॉर्म भरण्याबाबत मार्गदर्शन केले जात असून मतदार पडताळणी प्रक्रियेला गती मिळत आहे.
निवडणूक विभागाच्या वतीने सध्या मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेंतर्गत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, मृत, स्थलांतरित किंवा एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे वगळणे, तसेच मतदारांची माहिती अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी बीएलओ नागरिकांच्या घरी भेट देऊन कुटुंब व मतदारांची माहिती तपासत एसआयआर फॉर्म भरून घेत आहेत.
या शासकीय उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि बीएलओंना आवश्यक सहकार्य करावे, या उद्देशाने नगरसेविका पूनम चव्हाण यांनी ‘नगरसेविका आपल्या दारी’ ही मोहीम राबवली आहे. या माध्यमातून नागरिकांच्या शंका दूर करून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ केली जात असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सहकार्य केले जात आहे.







