लायन्स क्लब मालवणचा ‘युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस’ उपक्रम
मालवण | प्रतिनिधी
लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय ‘युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस’ उपक्रमांतर्गत लायन्स क्लब मालवणच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, वायरी भूतनाथ येथे ‘कळी उमलताना समज आणि सुरक्षितता’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी विशेषतः किशोरवयीन मुलींना शारीरिक आणि मानसिक बदलांविषयी योग्य माहिती दिली. पौष्टिक आहाराचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी, मोबाईल व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर तसेच सुरक्षिततेबाबत विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. संवादात्मक पद्धतीने घेतलेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसह लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोडकर, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, विश्वास गावंकर, गणेश प्रभुलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ताराम मालवणकर, उपाध्यक्ष प्रदीप वेंगुर्लेकर, पालक प्रतिनिधी सुभाष आचरेकर, मंदाकिनी लोके, पूनम गोसावी, सविता मसुरकर, विनायक झाड, नीता वायंगणकर, दादा वेंगुर्लेकर, मुख्याध्यापिका नेहा तांबे तसेच उपशिक्षिका प्रिया सावंत आणि राखी शिंदे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका नेहा तांबे, उपशिक्षिका प्रिया सावंत आणि राखी शिंदे यांनी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा आरोग्य व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.







