मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील देवबाग येथील श्री देव विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या, बुधवार (दि. २२ जुलै) ते २९ जुलै २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहानिमित्त धार्मिक विधी, भजन सेवा, दिंड्या, दशावतार नाट्यप्रयोग आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी १०.३० वाजता कुमारिका पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर श्री विठ्ठल-रखुमाई तसेच परिवार देवतांना गाऱ्हाणे घालून अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.
सप्ताहातील प्रमुख आकर्षण असलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांना श्री विठ्ठल-रखुमाईंच्या गाभाऱ्यात प्रवेश करून प्रत्यक्ष दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. वर्षभर ब्राह्मण पुजाऱ्यांशिवाय इतर कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश नसतो. आषाढी एकादशीच्या दिवशी काकड आरती, अभिषेक व नित्यपूजेनंतर सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५ वाजता तारकर्ली येथील तारी घराण्याची दिंडी, देवबाग भांजीवाडीची दिंडी तसेच भाटकर घराण्याची दिंडी मंदिरात दाखल होणार आहे. भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे. सप्ताहाच्या समाप्तीपूर्वी मांजरेकर घराण्याची दिंडीही श्रींच्या दर्शनासाठी येणार आहे.
आषाढी एकादशीला पंचक्रोशीतील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात. गुरुपौर्णिमेनिमित्त दशावतारातील विविध खेळ सादर करण्यात येणार असून, त्यानंतर समुद्रस्नान करून ओल्या अंगाने श्रीकृष्णाची आरती केली जाईल. यावेळी भाविकांना लाह्या आणि दह्याचा प्रसाद वितरित केला जाणार आहे. तसेच सप्ताहादरम्यान एका दिवशी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात भजन सेवा सादर करू इच्छिणाऱ्या पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी ९१४५३८०३४०, ९४०५२२६०३१ किंवा ७४९८१६१५३८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भजन मंडळांसाठी प्रवास खर्च तसेच चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री विठोबा देवालय देवबागचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.







