मालवण | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी उभारलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीची होत असलेली पडझड रोखण्यात पुरातत्त्व विभाग आणि शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी केला आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी तातडीने ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
वाईरकर म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचे विविध भाग यापूर्वीही कोसळले आहेत. मात्र पुरातत्त्व विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आवश्यक दुरुस्तीची कामे वेळेत आणि प्रभावीपणे झाली नाहीत. महाराजांचे गडकिल्ले पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाला नेमका कोणता अडथळा येतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या विषयावर अनेक आमदार, मंत्री आणि पालकमंत्र्यांनी विधिमंडळात वारंवार आवाज उठविला, मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन किल्ल्याच्या संवर्धनाची कामे युद्धपातळीवर सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
सध्या पावसाळा सुरू असून पुढील काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत किल्ल्याच्या तटबंदीचा आणखी भाग कोसळून नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही वाईरकर यांनी उपस्थित केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीच “महाराजांचे गडकिल्ले हीच त्यांची खरी स्मारके आहेत,” अशी भूमिका मांडली असल्याचे सांगत, या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी शासन आणि पुरातत्त्व विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही गणेश वाईरकर यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम आग्रही राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







