मालवण | प्रतिनिधी
सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम) अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षमित्र व लेखक प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात सन २०१५ मध्ये आपण २६८ हून अधिक झाडांची लागवड केली होती, याचा उल्लेख करत प्रकाश काळे म्हणाले, “हे महाविद्यालय निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच निसर्गाचा आनंद घ्यावा. झाडे जगली तरच माणूस जगेल. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करावे.”
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऑक्सिजन, पर्यावरण आणि निसर्गाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितले. तसेच वनस्पती आणि सजीव यांच्यातील भावनिक नाते अधोरेखित करणारी त्यांनी लिहिलेली “शाप” ही कविता सादर केली. त्यांच्या कवितेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला वनस्पती औषध संशोधक विनायक बापट, उदय पुरोहित, संस्थेचे विश्वस्त, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.






