मालवण | प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित करण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन सुरू आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत मालवणच्या शैक्षणिक क्षेत्राला मानाचा बहुमान मिळाला असून, सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजचे उपक्रमशील प्राध्यापक नागेश कदम यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्या इयत्ता नववीच्या इतिहास पाठ्यपुस्तक लेखन समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र मंडळाच्या संचालकांकडून प्रदान करण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची नव्याने निर्मिती केली जात असून, विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, कौशल्याधारित शिक्षण आणि मूल्याधिष्ठित शिक्षण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर इतिहास विषयाच्या नव्या पाठ्यपुस्तक निर्मितीत प्रा. नागेश कदम यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रा. कदम यांना अभ्यासक्रम निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी परिसर अभ्यास, इतिहास, नागरिकशास्त्र तसेच हिंदी विषयांच्या अभ्यासक्रम निर्मिती समितीवर सदस्य म्हणून प्रभावी काम केले आहे. राज्य व जिल्हास्तरावरील विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून, शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक कार्यशाळा आणि अभ्यासक्रम विकासात त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे.
शैक्षणिक कार्यासोबतच प्रा. कदम साहित्य क्षेत्रातही सक्रिय आहेत. निबंध, कथा आणि कविता लेखनाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने साहित्यनिर्मिती केली असून, त्यांचा हा अनुभव पाठ्यपुस्तकांच्या आशयाला अधिक समृद्ध आणि विद्यार्थीकेंद्रित बनविण्यास उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रा. नागेश कदम यांच्या निवडीबद्दल कृष्णराव सिताराम देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शालेय समितीचे अध्यक्ष महादेव पाटकर, डी.एड. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य दत्तात्रय माळी तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







