मालवण | प्रतिनिधी
“गाव सोडूचो नाय… जंगल तोडूचो नाय… माय माती सोडूचो नाय… लडाय सोडूचो नाय…” या कोकणच्या मातीचा सुगंध जपणाऱ्या गीतांच्या स्वरांत आज मालवणच्या किनारपट्टीवर पर्यावरण संरक्षणाचा बुलंद संदेश घुमला. सिंधुदुर्गातील ‘रानमाणूस’ म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘राखणदार पदयात्रे’ने जल, जंगल, जमीन आणि समुद्र संवर्धनाचा संदेश देत मालवणकरांना पर्यावरण रक्षणासाठी स्वतःच राखणदार बनण्याचे आवाहन केले.
वायरी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थानापासून सुरू झालेली ही पदयात्रा राजकोट किल्ल्यापर्यंत किनारी भागातून काढण्यात आली. पर्यावरणप्रेमी, पारंपरिक मच्छीमार, युवक आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात स्थानांचे रक्षण करणाऱ्या राखणदार देवस्थानांच्या परंपरेतून प्रेरणा घेत, जंगल, नद्या, समुद्र, जैवविविधता आणि पारंपरिक जीवनशैलीचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतः राखणदाराची भूमिका स्वीकारावी, हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता.
पदयात्रेची सुरुवात मोरयाचा धोंडा देवस्थानात गाऱ्हाणे घालून झाली. त्यानंतर दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात पर्यावरण रक्षणाची गाणी गात जनजागृती करण्यात आली. यावेळी पारंपरिक मच्छीमारांशी संवाद साधून अनधिकृत आणि अतिरेकी मासेमारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. समुद्र आणि सागरी जीवसृष्टीचे संरक्षण हेही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे अंग असल्याचे मत मच्छीमारांनी व्यक्त करत या अभियानाला पाठिंबा दर्शविला.
यानंतर दांडेश्वर मंदिर, गवंडीवाडा येथील गणेश येशू मंदिर तसेच मालवण शहरातील विविध भागांतून पदयात्रा पुढे सरकली. मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रेत्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. मेढा येथील मुस्लिम समाजाच्या पिराच्या दर्ग्यालाही भेट देत सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. मुस्लिम बांधवांशी संवाद साधत पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
पदयात्रेचा समारोप राजकोट किल्ल्यावर झाला. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून त्यांनी जल, जंगल आणि जमीन संवर्धनाबाबत दिलेल्या आज्ञापत्राचे वाचन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश यावेळी पुन्हा अधोरेखित करण्यात आला.
या राखणदार पदयात्रेत राखणदार टीमचे सदस्य, वाढवण बंदर प्रकल्प विरोधी समितीचे पदाधिकारी, इकोमेट्स, युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेचे सदस्य, पारंपरिक मच्छीमार तसेच मुंबई, मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण पदयात्रेदरम्यान पर्यावरण संरक्षणाची गाणी, जनजागृती आणि लोकसहभागामुळे मालवणच्या किनारपट्टीवर पर्यावरण संवर्धनाचा एक वेगळाच जागर अनुभवायला मिळाला.







