मालवण, प्रतिनिधी :
चिंदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तिमत्त्व सतिश रघुनाथ सावंत यांच्या दातृत्वातून आणि अरविंद बुवा पाताडे यांच्या पुढाकारातून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक रावजी तावडे आणि पत्रकार विवेक परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त शिक्षक रावजी तावडे यांनी सतिश रघुनाथ सावंत यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून सतिश सावंत सातत्याने चिंदर गावातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. त्यांचे हे कार्य निस्वार्थी, निरपेक्ष आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
तावडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना, शाळांना मिळणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या मदतीचे मोल ओळखण्याचे आवाहन केले. “या मदतीचे चीज करा. नियमित अभ्यास करा, स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या कर्तृत्वाने शाळेचे, आई-वडिलांचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल करा,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमासाठी राजेंद्र प्रसाद गाड, नंदकुमार जुंधळे, स्मिता जोशी, वैशाली चव्हाण, संतोष राठोड, अरुण आडे, निशिगंधा वझे, मैना कारंडे, गायकवाड, सचिन तवटे, योजना माळगांवकर, अशोक घोलप, सुरेश माडये आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.







