मालवण, दि. प्रतिनिधी :
आचरा येथील वीज वितरण उपकेंद्रात दीर्घकाळापासून अधिकारी नियुक्त न केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवार, २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आचरा वीज वितरण कार्यालयाला “टाळा ठोको” आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, आचरा सबस्टेशनमध्ये दीर्घकाळापासून अधिकारी नसल्याने परिसरातील नागरिकांना सातत्याने वीज समस्यांचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठ्यातील वारंवार होणारे बिघाड, तक्रारींचे वेळेत न होणारे निराकरण आणि प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या प्रश्नाकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही महावितरण प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
२३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ग्रामस्थांसह आचरा वीज वितरण कार्यालयाला टाळा ठोकण्यात येणार असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असताना, स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेतात, याकडे आचरा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







