मालवण, प्रतिनिधी :
मालवण आणि किनारपट्टी भागात सोने तारण ठेवून त्यावर आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू असून, अनेक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक, महिला आणि इतर नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भेटीत कथित गैरव्यवहाराची माहिती, बाधितांची संख्या आणि त्यांच्याकडील पुरावे शासनासमोर मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी संबंधित प्रकरणात आर्थिक फसवणूक झालेल्या सर्व मच्छीमार, महिला, पर्यटन व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनी पुढे येऊन आपली माहिती, व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांसह संपर्क साधावा, असे आवाहन रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत तपास यंत्रणांकडून कोणतीही अंतिम भूमिका जाहीर झालेली नसून, संबंधित तक्रारी आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







