मालवण | प्रतिनिधी
पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने मालवण तालुक्यातील खाडीपात्रांमध्ये पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू उपसा आणि अवैध वाळू वाहतुकीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने हडी परिसरात बुधवारी सायंकाळी धडक कारवाई करत बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे दोन डंपर जप्त केले. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
बुधवारी (दि. १५ जुलै) सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता हडी येथे महसूल विभागाच्या पथकाने केएल-६३ एफ-२३११ आणि जीए-०८ यू-३३९८ क्रमांकाचे दोन डंपर अडवून त्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमधून कोणतीही वैध परवानगी नसताना वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही डंपरमधून मिळून सुमारे दोन ब्रास वाळू आढळून आली.
त्यानंतर महसूल विभागाने दोन्ही डंपर जप्त करून ते मालवण तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. जप्त वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी निलेश वरुडे आणि बाळासो शिंदे, तसेच पोलीस पाटील श्री. सुर्वे व श्री. पांजरी यांच्या संयुक्त पथकाने केली.
दरम्यान, तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा आणि अवैध वाहतुकीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.







