पोईप | वार्ताहर
मालवण तालुक्यातील मालोंड-बेलाचीवाडी येथील रहिवासी अनिल राघो परब यांच्या घरावर नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यात सागाचे मोठे झाड कोसळून घराचे छप्पर पूर्णपणे उध्वस्त झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य हाती घेतले.
शिवसेना मालवण तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र ऊर्फ बाबू परब यांनी कार्यकर्त्यांसह घरावर कोसळलेले झाड हटवून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीचा दिलासा दिला. त्यानंतर या घटनेची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि तालुकाप्रमुख विनायक बाईत यांना देण्यात आली.
घटनेची दखल घेत तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी स्वखर्चातून घराच्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. लवकरच घराचे छप्पर पूर्ववत करण्यात येणार असून, संकटाच्या काळात शिवसेना कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नुकसानग्रस्त अनिल राघो परब यांना छप्पर दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य सुपूर्द करताना पंचायत समिती सदस्य तथा गटनेते संजय ऊर्फ छोटू ठाकूर, विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, प्रवक्ते निलेश बाईत, विभागीय सचिव मंगेश यादव, अल्पसंख्याक मसुरे विभागप्रमुख इस्माईल शेख, तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र परब, मालोंड-बेलाचीवाडीचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, माजी सरपंच हेमंत पारकर, माजी उपसरपंच नाना परब, माजी सरपंच सुभाष परब, संदीप परब, दिलीप परब, स्वप्नील दळवी तसेच घरमालक अनिल परब उपस्थित होते.
या मदतकार्याला शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्थानिक नागरिकांनीही या तातडीच्या मदतकार्याचे स्वागत करत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.







