सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती व तहसील कार्यालय येथे विशेष कक्ष; नोंदणी फॉर्म उपलब्ध
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकनाट्य परंपरेतील दशावतार कलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती येथे विशेष नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येणार असून, इच्छुक कलाकारांसाठी नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
देवगड, कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या आठही तालुक्यांमध्ये हे सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. पंचायत समिती स्तरावर विशेष नोंदणी कक्षाच्या माध्यमातून दशावतार कलाकार, दशावतार मंडळे आणि या लोककलेशी संबंधित विविध घटकांची माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्वेक्षणामुळे दशावतार परंपरेचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि भविष्यातील सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कोकणातील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार ही धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी समृद्ध लोकनाट्य परंपरा असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. या परंपरेचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि लोककलावंतांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांनी आपल्या संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या विशेष नोंदणी कक्षाला भेट देऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.






