मालवण प्रतिनिधी
दशावतार कला आणि कलाकार प्रेमी मालवण आयोजित मालवणी जत्रा, संयुक्त दशावतार यांच्या वतीने लौकीकप्राप्त अभ्यासू कलाकारांच्या संचाचा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग ‘शिव अजमिढ संग्राम’ (अर्थात अजमिढ शरसेतू) रविवारी १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दैवज्ञ भवन हॉल, फोवकांडा पिंपळ, मालवण येथे रंगणार आहे. या नाट्यप्रयोगात दत्तप्रसाद शेणई, सुहास (मामा) माळकर, बाबा मयेकर, मोरेश्वर सावंत, नीलकंठ सावंत, सागर गावकर, महेंद्र कुडव, उदय मोर्ये, चारुहास मांजरेकर, प्रशांत मयेकर, सुयश ठाकूर, शिवा मेस्त्री आणि प्रथमेश सामंत हे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. तर हार्मोनियमवर गुणाजी घाडीगावकर, मृदंगमणी किसन नेमळेकर आणि तालरक्षक हरेश नेमळेकर संगीत साथ देणार आहेत. या कार्यक्रमासाठी बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ कोळंब यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

त्याचप्रमाणे दशावतारी कलावंताच्या हितैक्यासाठी झटणाऱ्या दशावतार कला आणि कलाकार प्रेमी मालवण संघटनेच्या वतीने यानिमित्ताने काही कलाप्रेमींचाही सन्मान होणार आहे. दशावतारी लोककलावंताच्या समस्येला वाचा फोडणारे निर्भिड पत्रकार मनोज चव्हाण यांचा सन्मान होणार आहे. त्याचसोबत मालवणच्या कलाक्षेत्राची कोकणात सर्वदूर पोहोचवणारे कलावंत यांना देखील या विशेष सोहळ्यात गौरवले जाणार आहे. संगीत अलंकार दिलीप प्रभाकर ठाकूर, तबला विशारद सुधीर मच्छिंद्रनाथ गोसावी, नाट्य अभिनेत्री शुभदा सचिन टिकम यांचा विशेष सत्कार दशावतार कला आणि कलाकार प्रेमी, मालवण यांच्या वतीने रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.







