मालवण (प्रतिनिधी) : कोकणशक्तीने गेली अनेक वर्षे मालवण व कुडाळ तालुक्यातील जीर्ण आणि नादुरुस्त झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेडचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. या वृत्ताची दखल घेत आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून या शेडच्या पुनर्बांधणीसाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तसेच कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव आणि माणगाव येथील जीर्ण झालेल्या मार्ग निवारा शेडचे पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. प्रत्येक शेडसाठी २० लाख रुपये या प्रमाणे एकूण १ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जनसामान्यांच्या मागणीसाठी पाठपुरावा करत हा निधी मंजूर करण्यात यश मिळवल्याबद्दल मालवण आणि कुडाळवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.
या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रक्रिया पूर्ण होताच जुन्या व धोकादायक शेड हटवून नव्या मार्ग निवारा शेडच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून उन्हाळा, पावसाळा आणि वादळी वाऱ्यात उभे राहून एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.







