चार विद्यार्थ्यांची मालवण तालुका गुणवत्ता यादीत निवड; शिष्यवृत्ती मिळविण्याचा मान
मालवण (प्रतिनिधी) :
फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पोईप-विरण येथील इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रशालेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रत्येकी दोन अशा एकूण चार विद्यार्थ्यांनी मालवण तालुका गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
इयत्ता पाचवीमध्ये आरुष प्रसाद चव्हाण याने मालवण तालुका गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक, तर स्वरा किशोर गावडे हिने नववा क्रमांक मिळविला. इयत्ता आठवीमध्ये आर्ची अजित भोगले हिने चौथा क्रमांक, तर देवयानी गोपाल पाचंगे हिने आठवा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती मिळविण्याचा मान मिळविला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर, मुख्याध्यापक विकास कुंभार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पोईप पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







