डॉ. रत्नाकर कोयंडे यांचा सत्कार; नगरसेवकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुका गाबित समाजाच्या वतीने सन २०२५-२६ मधील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबित समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा शनिवार, १२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आलेले डॉ. रत्नाकर कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, प्रख्यात अभियंता लक्ष्मीकांत खोबरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात डॉ. रत्नाकर कोयंडे यांचा गाबित समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मालवण नगरपरिषदेत नगरसेवक व नगरसेविका म्हणून कार्यरत असलेल्या गाबित समाजातील लोकप्रतिनिधींचाही गौरव करण्यात येणार आहे.
या गौरव सोहळ्यास गाबित समाजातील सर्व समाजबांधव, भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती आपल्या विभागातील मालवण गाबित समाज कार्यकारिणी सदस्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन मालवण तालुका गाबित समाजाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी केले आहे.







