मालवण (प्रतिनिधी):
ग्रामपंचायत चिंदर येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांच्या पथकाने विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला एनडीआरएफचे नरेंद्रसिंग चव्हाण, ऋषभ शर्मा आणि निखिल गावडे, चिंदर ग्रामपंचायतीच्या प्रशासक स्वरा पालकर, माजी उपसरपंच महेंद्र मांजरेकर, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव, पंचायत समिती मालवणचे विस्तार अधिकारी आत्माराम परब, लक्ष्मण हांडे, कृषी अधिकारी सौ. धामापूरकर, आचराचे ग्रामविकास अधिकारी कासले तसेच चिंदर, आचरा, हडी आणि बांदिवडे येथील ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी एनडीआरएफच्या पथकाने अचानक आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी, रस्ते अपघातातील प्राथमिक मदत, हृदयविकाराच्या रुग्णाला सीपीआर (CPR) देण्याची योग्य पद्धत, खाताना घशात अन्न अडकल्यास करावयाची प्रथमोपचार प्रक्रिया तसेच टाकाऊ वस्तूंपासून जीवरक्षक साहित्य तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य प्रशिक्षणाच्या आधारे तातडीने मदतकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी केले. कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.







