विश्वास मोंडकर यांचा पत्नीच्या स्मरणार्थ उपक्रम; मराठी शाळा टिकविण्यासाठी पालकांना आवाहन
मालवण (प्रतिनिधी) :
मालवण येथील दांडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोंडकर यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ छत्र्यांचे वाटप केले. यावेळी मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश देऊन विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास विश्वास मोंडकर, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेवक तपस्वी मयेकर, मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, दिनकर शेलटकर, किशोर मोंडकर, प्रणिता रेवंडकर, शिक्षिका श्रद्धा बागवे, अमृता राणे, उज्ज्वला चौकेकर तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना विश्वास मोंडकर म्हणाले, सध्या अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी मराठी शाळा टिकणे आवश्यक असून पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे.
नगरसेवक महेश कोयंडे यांनी दांडी शाळेसमोरील विविध समस्यांचा उल्लेख करत शाळा तसेच पालकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगितले. नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करत दांडी शाळेला कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तर किशोर मोंडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल विश्वास मोंडकर यांचे आभार मानले.







