मालवण (प्रतिनिधी):
शालेय जीवनात सातत्य, कष्ट, जिद्द आणि मन लावून अभ्यास करण्याची तयारी ठेवली, तसेच निर्व्यसनी राहण्याचा संकल्प केला, तर जीवनातील कोणतेही ध्येय गाठणे शक्य होते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात पूर्ण क्षमतेने झोकून देऊन काम करावे, असे प्रतिपादन कणकवलीचे सुप्रसिद्ध वकील व कट्टा वराडकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी ॲड. दीपक अंधारी यांनी केले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉ. दादासाहेब वराडकर आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर होते. व्यासपीठावर खजिनदार श्याम पावसकर, स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, केंद्रप्रमुख गौरव नाईक आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर शिक्षक समीर चांदरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
मार्गदर्शन करताना ॲड. दीपक अंधारी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य राखून त्याला प्रामाणिकतेची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठणे अधिक सुलभ होते. शिक्षणाबरोबरच चांगले चारित्र्य आणि व्यसनमुक्त जीवन हीदेखील यशाची महत्त्वाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात अजयराज वराडकर यांनी सांगितले की, योगात्मा काकासाहेब वराडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी या दशक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी या संस्थेची स्थापना केली. ज्या शाळेने आपल्याला ज्ञान दिले, त्या शाळेचे ऋण विसरता कामा नये. शाळेविषयी आत्मीयता बाळगून समाजात कसे वागावे, याचे संस्कार विद्यार्थ्यांनी जपले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला, संगीत तसेच महाविद्यालयीन कला व वाणिज्य शाखेतील उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे ॲड. दीपक अंधारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक किसन हडलगेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी मानले.







