मालवण प्रतिनिधी : स्वर्गीय मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान, पेंडूर, संजय नाईक मित्र मंडळ आणि नाईक कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने पेंडूर येथे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.
पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून पेंडूर गावातील सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर क्र. १, पेंडूर क्र. २, सोनारवाडी, खरारे, पराड, मोगरणे येथील शाळांमधील विद्यार्थी तसेच संबंधित अंगणवाड्यांतील चिमुकल्यांना झाला.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. संजय नाईक यांच्या प्रेरणास्थळी उभारलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर प्रेरणास्थळ परिसरात सोनचाफ्याचे रोप लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्व. नाईक यांच्या शैक्षणिक आणि समाजाभिमुख कार्याचा सुगंध समाजात कायम दरवळत राहावा, या भावनेतून सोनचाफ्याचे रोप लावण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. यापुढेही प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी डॉ. सोमनाथ परब यांनी स्व. संजय नाईक यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या समाजोपयोगी संकल्पांची पूर्तता करण्यासाठी संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.
प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि लोकहिताचे उपक्रम राबविले जात असून, स्व. संजय नाईक यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा अधिक व्यापक करण्यासाठी भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.






