मालवण दि प्रतिनिधी :-
चौके पंचक्रोशी मर्यादित जेष्ठ सेवा संघ या संघटनेची सभा कार्याध्यक्ष श्री सदाशिव गावडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली चौके ग्रामदेवता श्री भराडी देवी मंदिर येथे संपन्न झाली.या सेवा संघांचे या पूर्वीचे अध्यक्ष अंकुश पोफळे यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते त्या जागी नवीन अध्यक्ष निवड तसेच नवीन सभासद जोडणे यासाठी ही सभा घेण्यात आली होती.
यावेळी पुढील कालावधीसाठी नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली.उपस्थित जेष्ठ नागरिक यांच्यामधून निवृत्त पोलीस अधिकारी श्री शिवाजी नारायण पोफळे यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी शिवराम नारायण आंबेरकर, बुधाजी रोहिदास चौकेकर, कार्याध्यक्ष सदाशिव लक्ष्मण गावडे – गुरुजी, सचिव यशवंत धोंडी चव्हाण, सहसचिव रमाकांत श्रीधर देसाई, हिशोब तपासणीस किशोर प्रभाकर पाताडे अशी नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली.
यावेळी श्री मधुकर सहदेव चौकेकर, रमाकांत गोविंद गावडे,सत्यवान दत्ताराम पवार,विशवनाथ गोविंद गावडे, विष्णू सखाराम घाडी, रमेश देवू परब, नारायण सहदेव काटकर, वासुदेव श्रीधर सावंत, सुरेश दाजी कामते, सुंदरी नामदेव चव्हाण यांच्यासह नवीन सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी नूतन अध्यक्ष शिवाजी पोफळे यांनी चौके ग्रामदेवता आई भराडी देविचा आशीर्वाद घेत आपल्याला कायद्याचे पुरेपूर ज्ञान असल्याने सर्वांच्या सहकार्याने पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या सर्व योजना मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून यापुढे सर्वांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. यानंतर कार्याध्यक्ष सदाशिव गावडे गुरुजी यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या उद्दिष्टांबाबत आपली भूमिका मांडत मार्गदर्शन केले तर नूतन उपाध्यक्ष श्री बुधाजी चौकेकर यांनी प्रास्ताविक तसेच उपस्थित त्यांचे आभार मानले.







