मालवण, दि प्रतिनिधी
मालवण पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी तसेच पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्या दालनात बसवण्यात आलेली वातानुकूलित यंत्रणा तात्काळ काढून घेण्यात यावी, अशी जाहीर मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते महेश विठोबा जुवाटकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र सादर केले असून, कार्यालयातील सद्यस्थितीत सुरू असलेली एसी यंत्रणा बंद करून ती तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
महेश जुवाटकर यांनी आपल्या पत्रात शासनाच्या विविध शासन निर्णय आणि परिपत्रकांचे संदर्भ दिले आहेत. त्यांच्या मते, शासकीय कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यासाठी ठराविक वेतनश्रेणी आणि पदांचे निकष ठरलेले आहेत. सध्या मालवण पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आलेले एसी हे या नियमांमध्ये बसत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. जुवाटकर यांनी आपल्या पत्रात सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक (१९९९) या पहिल्या संदर्भानुसार, राज्यातील ज्या
शासकीय अधिकाऱ्यांचे किमान वेतन १८,४०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशाच वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रणा मंजुरीची तरतूद होती. सहावा वेतन आयोग (२०१२) या सुधारित निर्णयानुसार, वेतन बँड ३७,४०० – ६७,००० आणि ग्रेड वेतन १०,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वेतन बँड ग्रेड असणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांच्या दालनांनाच एसी लावण्याची अनुज्ञेयता देण्यात आली होती. सातवा वेतन आयोग (२०२२) सध्याच्या ७ व्या वेतन आयोगानुसार, ज्या उच्च अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी ‘वेतन स्तर ८-३०’ (१,४४,२०० रुपये ते २,१८,२०० रुपये) व त्यापेक्षा अधिक आहे, अशाच अत्यंत उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात एसी बसवण्याची सुविधा देण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या वेतन पातळीत (S-30 किंवा त्याहून अधिक) मालवण पंचायत समितीमधील संबंधित पदे येत नाहीत. त्यामुळे या कार्यालयात नियमाबाह्य पद्धतीने एसी बसवण्यात आले आहेत.
त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे आपल्या कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा बसविता येत नसल्याने, आपल्या कार्यालयात सद्य स्थितीत चालू असलेली वातानुकूलित यंत्रणा बंद करून ती वातानुकूलित यंत्रे तात्काळ काढण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.







