मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध मटका जुगाराबाबत वारंवार लक्ष वेधून देखील पोलीस प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने या विरोधात आज महाराष्ट्र दिनी ठाकरे शिवसेना पक्षाकडून मालवण पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात आले. मालवणमध्ये शिंदे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणात मटका जुगार चालवत असून पोलिसांनी बारीक सारीक करावाया करण्याऐवजी मटका जुगार चालवाणाऱ्या आकांवरच कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली.
मालवण पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसलेल्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, महिला आघाडीच्या दिपा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, रेवंडी सरपंच अमोल वस्त, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर व हेमंत मोंडकर, गणपत आडिवरेकर, बंड्या सरमळकर, नंदू गवंडी, दत्ता पोईपकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
मालवण शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका जुगार छुप्या व उघड मार्गाने सुरु आहे. याकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. या मटका जुगार मधून युवा व तरुण पिढी बरबाद होत आहे, अनेकजण व्यसनांच्या व नशेच्या आहारी देखील जात आहेत. पोलीस केवळ छोट्या कारवाया करत आहेत. यामध्ये मटका जुगार चालविणारी बडी मंडळी बाजूलाच राहत आहेत. मालवण मधील मटका जुगार शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते चालवीत आहेत. असे असताना शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्यांवर हप्ते वसुलीचे आरोप करत आहेत, असे यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी लहानसहान व्यक्तींना न पकडता थेट मटका चालविणाऱ्यांवर कारवाई कारवी, अशी मागणी बाबी जोगी यांनी केली.







