मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे शैक्षणिक कार्य हे विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन आर. पी. बागवे हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी योग्य अभ्यास नियोजन, आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता विकसित करण्यासाठी आयोजित कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबईच्या कार्यकारिणी व लोकल कमिटी मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन सौ. अर्चना कोदे यांच्या हस्ते मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये संपन्न झाले.
या कार्यक्रमाला मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष उत्तम राणे, खजिनदार संजय बागवे, देऊळवाडा प्रशालेचे मुख्याध्यापक एस. आर. कांबळे, डी. पी. पेडणेकर, भानुदास परब, समीर नाईक, दत्तप्रसाद पेडणेकर, पंडित नाचणकर, इरफान शेख, रमेश पाताडे, नीता सावंत, अनिल मेस्त्री, भरत ठाकूर, सुनील बांदेकर, शशांक पिंगुळकर, विशाखा जाधव, विवा तळाशीलकर, आर्या भोगले, चरणदास फुकट आदी मान्यवर व संस्था सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष उत्तम राणे आणि खजिनदार संजय बागवे यांनी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यशाळेत मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कळसुली हायस्कूलचे सी. जी. चव्हाण सर, सौ. चव्हाण मॅडम, भगवती हायस्कूल मुणगेचे प्रसाद बागवे, विद्या मंदिर हायस्कूल कणकवलीचे पृथ्वीराज बर्डे सर, तसेच न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचे संगम चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई व लोकल कमिटी मसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष डॉ. दीपक मुळीक परब, सचिव प्रसाद बागवे, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब तसेच प्रशालेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या केले.







