मालवणः (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील आचरे गावात भोंदूगिरी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अभाअनिस) कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘मी कोणाचीही फसवणूक करणार नाही, यापुढे अभाअनिसला सहकार्य करीन,’ असा लेखी कबुलीनामा भोंदू बाबाकडून घेण्यात आला आहे.
आचरे येथील एका वाडीत राहणाऱ्या एका भोंदूबाबाने स्वतःला अलौकिक शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करत सोशल मीडियावर जाहिराती केल्या होत्या. वेताळ देवाच्या कृपेने लोकांचे भूत, वर्तमान आणि भविष्य सांगू शकतो, तसेच विविध समस्या दूर करण्यासाठी ‘कौल’, ‘ताईत’ व अन्य धार्मिक विधी करून देतो, असे तो सांगत होता. यासाठी त्याने गुगल पे व व्हॉट्सअॅपद्वारे पैसे स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. कौलासाठी १०० रुपये, तर ताईत व इतर उपायांसाठी ३५० ते १५,००० रुपये आकारले जात होते.
सदर प्रकार अभाअनिसच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी तीनवेळा संबंधित भोंदूच्या घरी जाऊन वेगवेगळ्या समस्यांच्या नावाखाली माहिती घेतली. या भेटीत त्याचे फोन कॉल रेकॉर्डिंग व व्हीडिओ शूटिंग करण्यात आले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष अॅड. राजीव बिले, जिल्हा सचिव अजित कानशिडे, कार्यकर्ते मारुती सोनवडेकर यांच्या उपस्थितीत पुन्हा भेट देण्यात आली. यावेळी संबंधित भोंदूबाबास जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती देण्यात आली. तसेच त्याने केलेल्या कृत्यांमुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव करून दिल्यानंतर त्याने आपल्याकडे कोणतीही अलौकिक शक्ती नसल्याची कबुली दिली. यापुढे अशाप्रकारे कोणाचेही काम करणार नाही, तसेच फक्त देवदर्शनासाठीच लोक येऊ शकतात, असे त्याने स्पष्ट केले. त्याने यासंदर्भात लेखी माफीनामा देऊन छोटा व्हीडिओही तयार केला आहे. सदर व्यक्तीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे लक्षात आल्याने त्याच्यावर पोलीस तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. मात्र, भविष्यात अशाप्रकारची फसवणूक केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अभाअनिसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. समाजात अशा भोंदूबाबांकडून फसवणूक होत असल्याने सावध राहवे, असे आवाहन केले. कोणाची फसवणूक झाली असेल, तर अंनिसशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. राजीव बिले व संघटक विजय चौकेकर यांनी केले आहे.







