मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रामध्ये व किनाऱ्यालगत महसूल विभाग आणि बंदर विभाग यांच्या पथकामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त पाहणीत कालावल खाडीतील बंडा बेटा नजीक वाळूने भरलेल्या तीन होड्या व शेरे जमिनीत असलेला वाळू साठा ताब्यात घेण्यात आला आहे तसेच रेवंडी स्मशानभूमी, गावकरवाडी वायांगणी सडयेवाडी, तेरई, भगवंतगड, तोंडवळी करंजेवाडी तोंडवळी मधलीवाडी येथे आढळून आलेले वाळू किनाऱ्यावर उतरविण्यासाठी वापरले जाणारे दगडी व लोखंडी रॅम्प नष्ट करून टाकण्याची सूचना महसूल प्रशासनाने दिली आहे.
कालावल खाडीपात्रामध्ये होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर मालवण महसूल विभाग व बंदर विभाग यांच्यामार्फत कालावल खाडीत संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये रेवंडी जेटी परिसर व त्या समोरील भागात अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याचे दिसून आले नाही. या पथकाला बंडा बेटानजीक वाळूने भरलेल्या तीन होड्या किनाऱ्यावर आढळून आल्या. या होड्यांमध्ये अनुक्रमे ६ ब्रास, २ ब्रास व ५ ब्रास एवढी वाळू होती तर शेरे जमिनीमध्ये ४ ब्रास वाळूचां साठा आढळून आला. ही वाळू व होड्या मालवण बंदर निरीक्षक यांनी तोंडवळी पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिल्या आहेत.
तसेच या पाहणी दरम्यान रेवंडी स्मशानभूमी येथे पाडलेल्या स्थितीत दगडी रॅम्प दिसून आले. गावकरवाडी येथे २ लोखंडी रॅम्प दिसून आले. तसेच वायंगणी सडयेवाडी येथे ४ दगडी रॅम्प व ४ लोखंडी रॅम्प, तेरई येथे ७ दगडी रॅम्प, भगवंतगड येथे ७ दगडी रॅम्प व ४ लोखंडी रॅम्प, तोंडवळी करंजेवाडी येथे ४ दगडी रॅम्प, तोंडवळी मधलीवाडी येथे एका ठिकाणी ७ तर दुसऱ्या ठिकाणी ८ दगडी रॅम्प दिसून आले. हे सर्व रॅम्प नष्ट करून टाकण्याच्या सूचना प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.







