मालवण,दि प्रतिनिधी
महाराष्ट्र सागरी हद्दीत एलईडी लाईट्सचा वापर करून होणाऱ्या अवैध मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली असून मालवण देवबाग समोरील सागरी क्षेत्रात गस्त घालत असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातील ‘भुवनेश्वरी’ ही मासेमारी नौका अनधिकृतपणे एलईडी लाईट्सचा प्रकाशझोत लावून उभी असल्याचे गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत साधारण ११ ते १२ सागरी मैल अंतरावर ही नौका आढळली असून, परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी मालवण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या नौकेवर धडक कारवाई केली. ही नौका सध्या जप्त करण्यात आली असून ती मालवण येथील सर्जेकोट बंदरात अवरुद्ध करून ठेवण्यात आली आहे.
या नौकेचे मालक महेश मनोहर आयरे (रा. शिरगाव, रत्नागिरी) असून कारवाईच्या वेळी नौकेवर तांडेलसह एकूण दोन खलाशी उपस्थित होते. सदर नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे सादर केला जाणार असून, सुनावणीनंतर नौका मालक आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे.
सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मायबा, परब, जाधव, जुवाटकर आणि सावजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समुद्री पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्यासाठी मत्स्य विभागाने आपला गस्तीचा वेग वाढवला आहे.







