मालवण, दि. प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या मालवण तालुक्यातील वराड येथील शिवलिंग प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. वराडवासीयांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर आज ग्रामदैवत श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली.
यावेळी वराड गावातील सावरवाड येथे “रुद्रनाद फाऊंडेशन”मार्फत उभारण्यात आलेल्या स्फटिक शिवलिंगाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले. संबंधित फाउंडेशनकडून धार्मिकतेच्या नावाखाली बेकायदेशीर व नियमबाह्य कृत्ये केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच भक्तांकडून पैसे उकळणे, धार्मिक भावना भडकविणे आणि गावातील शांतता व एकोप्यावर परिणाम करणाऱ्या कृती होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. तसेच प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
या संदर्भात श्री देव वेताळ ट्रस्टचे पदाधिकारी, गावकर, पालटदार तसेच सुमारे १२०० हून अधिक ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन आमदारांकडे सादर करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्याकडेही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या मते, रात्रीच्या वेळी गोवा राज्यातून महिला-पुरुष मोठ्या संख्येने येथे येत असून पहाटेपर्यंत संशयास्पद हालचाली सुरू असतात. त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी कारवाईबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.







