मालवण (प्रतिनिधी)
माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मालवण तालुका उबाठा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे, यानिमित्त दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. मालवण भरड येथील नगरपालिकेच्या वाहनतळावर माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा होणार असून नेरूर येथील पारंपारिक रोंबाट या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे, अशी माहिती उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील उबाठा शिवसेना शाखेत पत्रकार परिषद झाली, त्यावेळी हरी खोबरेकर यांच्या समवेत शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नंदू गवंडी, महेश जावकर, उमेश मांजरेकर, सौ. दिपा शिंदे, राजा शंकरदास, चिंतामणी मयेकर, सुप्रिया मडये, रवि तळाशीलकर, हेमंत मोंडकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
माजी आमदार वैभव नाईक हे जनतेच्या लढ्यात उतरून काम करत आहेत. वैभव नाईक यांच्या प्रेमाखातर कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करत आहेत. नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात ग्रामीण भागातही विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम होणार आहेत, असे यावेळी हरी खोबरेकर यांनी सांगत मालवण येथे होणाऱ्या वैभव नाईक यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमात सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक व मालवण वासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले.







