कोकणशक्ती – सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी :
सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल व इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार पेट्रोल, पेट्रोलियम उत्पादने तसेच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वाहून नेणारी वाहने ही अत्यावश्यक सेवा (Essential Services) म्हणून घोषित करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व महामार्ग, मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरून या वाहनांना मुक्त संचाराचा अधिकार राहील.
तसेच कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने अशा वाहनांना अडवणे, त्यांचा मार्ग रोखणे, चालकांना धमकावणे किंवा वाहतुकीत अडथळा निर्माण करणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३ तसेच इतर संबंधित फौजदारी कलमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. तसेच इंधनपुरवठा करणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार व मागणीनुसार पोलीस संरक्षण पुरवण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी कार्यवाही करायची आहे.
सदर आदेश आज दिनांक १० मार्च २०२६ पासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.







