मालवण, दि. (प्रतिनिधी) :
मालवण तालुक्यातील पोईप येथील ७५ एकर धरण क्षेत्रामध्ये मिनी एमआयडीसीच्या धर्तीवर उद्योग प्रकल्प सुरू करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही आमदार निलेश राणे यांनी शिवसेना मालवण तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम यांना दिली आहे.
अधिवेशन कालावधीत पंकज वर्दम यांनी आमदार निलेश राणे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत पोईप येथील ७५ एकर धरण क्षेत्रात शासनामार्फत उद्योग प्रकल्प राबविण्याची मागणी केली. या प्रकल्पामुळे पोईप पंचक्रोशीतील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावर सकारात्मक प्रतिसाद देताना आमदार राणे यांनी कार्यकर्ते व जनतेला दिलेला शब्द आपण नेहमी पाळत असल्याचे सांगितले. दोन महिन्यांपूर्वी पक्षप्रवेशावेळी पोईप येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात स्थानिक विकासाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून ते निश्चित पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती पंकज वर्दम यांनी पत्रकारांना दिली.
तसेच मुंबईहून परतल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोईप धरण क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून भौगोलिक परिस्थितीचा सर्व्हे केला जाईल. त्या अनुषंगाने कोणता उद्योग प्रकल्प राबविता येईल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील, याचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही आमदार राणे यांनी सांगितल्याचे वर्दम यांनी नमूद केले.
दरम्यान, पोईप धरण बाधित जमीन तसेच इतर विकास समस्यांबाबत झालेल्या या सकारात्मक चर्चेमुळे पोईप परिसरातील नागरिक व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.







