मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली ताकद वाढविली असून, “मालवणात शिवसेनेचाच भगवा फडकेल” असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. शहरातील प्रचारसभेत त्यांनी भाजप आणि त्यांचे उमेदवार यांच्यावर जोरदार टीका करत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले,
“आमच्याकडे चारित्र्यसंपन्न नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे. शहराला कुटुंब मानणारी, स्वच्छ प्रतिमा असलेली आणि भ्रष्टाचाराला स्पर्शही न करणारी लक्ष्मी आम्ही नगरपालिकेला देणार आहोत.”
याउलट भाजपवर निशाणा साधत त्यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर गंभीर आरोप करत दत्ता सामंत यांनी टीकेचे आसूड ओढले आहेत,
“जे उमेदवार काही दिवसांपूर्वी ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणून मोर्चात चालत होते, ओबीसी आरक्षण पडल्यानंतर अचानक ओबीसी झाले! सुरुवातीपासूनच खोटं कसं बोलायचं आणि कसं करणायचं याची तयारी BJPकडून होत आहे. उद्या नगरपालिका काबीज केल्यास ही माणसं कोणत्या थराला जातील, हे मतदारांनीच विचार करायला हवं.”
भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवाराने राजकोट पुतळ्याच्या प्रसंगी शिवराळ भाषा वापरल्याचे सर्वांनी पाहिले असल्याचे सांगून त्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी कधीही शिवराळ भाषा येत नाही. हे मतदारांनी लक्षात ठेवावे,” असा टोला सामंत यांनी लगावला.
यानंतर त्यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या कामांची प्रशंसा केली.
“मागील एक वर्षात निलेश राणे यांनी विधिमंडळात उत्कृष्ट काम करत मतदारसंघाला राज्यातील टॉप १० मध्ये नेले आहे. नारायण राणे यांनी या मतदारसंघाची जी उंची गाठली होती, ती २०१४ नंतर ढासळली. आता पुन्हा त्याला शिखरावर नेण्याचं काम निलेश राणे करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
अडथळे निर्माण करण्याचा अनेकांचा प्रयत्न असला तरी जनता सुज्ञ असल्याने शिवसेनेवर विश्वास दाखवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आमचा एकही उमेदवार पडणार नाही. नगराध्यक्ष पदाची उमेदवारासह सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा आत्मविश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
मालवणातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना सामंत यांच्या विधानांमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळत आहे.







