मालवण | प्रतिनिधी
मालवणी मुलुखातील रंगकर्मी श्री. सगुण पोयेकर उर्फ मोहन पोयेकर यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेऊन मातृत्व आधार परिवाराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सावंतवाडी येथे दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘मालवणी करंडक’ एकांकिका महोत्सवात मालवण तालुक्यातील भरड येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी सगुण पोयेकर यांचा ‘कला गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ओंकार कला मंच व पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय नाट्यमहोत्सवात नाट्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये सगुण पोयेकर यांची निवड करण्यात आल्याने मालवण तालुक्याच्या नाट्यवर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
मालवण परिसरात काही वर्षांपूर्वी अनेक ऐतिहासिक नाटकांना प्रभावी दिग्दर्शन करून रंगभूमी समृद्ध करणारे मोहन पोयेकर हे एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत नुकताच त्यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मालवणमध्ये पूर्वी अनेक जाणते व हाडाचे कलाकार होऊन गेले; मात्र काळाच्या ओघात अशी अनेक व्यक्तिमत्वे नव्या पिढीच्या नजरेआड व विस्मृतीत गेल्याचे चित्र आज दिसून येते. अशा परिस्थितीत पोयेकर यांनी रंगभूमीस दिलेले योगदान आणि त्यावेळचा त्यांचा नावलौकिक लक्षात घेता त्यांना प्राप्त झालेला कलागौरव पुरस्कार अत्यंत योग्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मातृत्व आधार परिवाराने त्यांना विनम्र व आदरपूर्वक सन्मानित करत अभिनंदन केले तसेच त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. वयाच्या ८६ व्या वर्षीही कलासाधनेची परंपरा जपणाऱ्या या आदरणीय व्यक्तिमत्वाला यावेळी मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.







