मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरात मोटरसायकलवरून अनधिकृतपणे गादी विक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांविरोधात स्थानिक जागरूक तरुणांनी पुढाकार घेत कारवाई घडवून आणली. विक्रीसाठी फिरणाऱ्या तीन विक्रेत्यांना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली असून त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी संबंधित विक्रेत्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली.
देऊळवाडा येथे विक्रेत्यांना अडवले
मालवण शहरात काही दिवसांपासून मोटरसायकलवर मोठ्या प्रमाणात गाद्यांचा लोड घेऊन विक्री करणारे परप्रांतीय विक्रेते फिरत असल्याचे स्थानिक तरुणांच्या निदर्शनास आले होते. यानंतर देऊळवाडा परिसरात तरुणांनी तीन विक्रेत्यांना अडवून चौकशी केली.
चौकशीदरम्यान संबंधित विक्रेत्यांकडे शहरात फिरून विक्री करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच मोटरसायकलवर धोकादायक पद्धतीने गाद्यांचा मोठा साठा वाहून नेल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले.
पोलिसांकडून दंडात्मक कारवाई
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी श्री. वानोळे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संबंधित विक्रेत्यांना पोलिसांच्या ताब्यात घेऊन मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईसाठी मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
स्थानिक तरुणांचा सक्रिय सहभाग
या कारवाईत श्रीराज बादेकर, हरीश पडते, अनिकेत फाटक, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, सुशांत तायशेट्ये, स्वप्नील घाडीगावकर, प्रदीप गावकर आदी तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
नगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, मालवण शहरात मोटरसायकलवरून गादी तसेच इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या विनापरवाना विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बाजारपेठेतील स्थानिक विक्रेत्यांकडून नियमित कर वसुली केली जात असताना बाहेरील विक्रेत्यांवर नियंत्रण का ठेवले जात नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा विनापरवाना विक्रेत्यांवर नगरपालिका प्रशासनाने लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.








