सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी ११५ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी २४४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले. आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी गस्त वाढवणे, प्रतिबंधात्मक कारवाई आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदारसंख्या
जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ५,६१,१०५ असून त्यात २,८२,५८८ महिला मतदार आणि २,७८,५१६ पुरुष मतदार आहेत. मतदान व मतमोजणीसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये
मतदाराची ओळख पटवण्यासाठी न मिटणाऱ्या शाईचा वापर
आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यरत
mahasecvoterlist.in अॅपद्वारे मतदार यादीतील नाव शोधता येणार
गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध ‘Matadhikar’ अॅपद्वारे मतदार माहिती मिळणार
मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास आधी प्रचारास बंदी
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन समिती व निवडणूक सनियंत्रण समिती गठीत
खर्च नियंत्रण समिती व कॅश रिलीज कमिटी स्थापन
मतदान केंद्रांची माहिती
एकूण मतदान केंद्रे : ८७० पैकी ८१० केंद्रांवर मतदान
६७६ इमारतींमध्ये ८१० मतदान केंद्रे
शॅडो एरिया मतदान केंद्रे : ७०
१००० पेक्षा जास्त मतदार असलेली केंद्रे : ८६
मनुष्यबळ व यंत्रणा
क्षेत्रीय दंडाधिकारी : १३२
केंद्राध्यक्ष : ८९१
मतदान अधिकारी (०१, ०२, ०३) : प्रत्येकी ८९१
शिपाई : ८७२ | व्यवस्थापक : ८७२
एकूण कर्मचारी : ५,४४०
निवडणूक निर्णय अधिकारी : ०८ | सहाय्यक : १६
निवडणूक निरीक्षक : ०२
मतदान यंत्रे
आवश्यक सीयू : ८१० | राखीव : ४८०
आवश्यक बीयू : ८१० | राखीव : ११६२
प्रशिक्षण व मतमोजणी व्यवस्था
केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण
तिसरे प्रशिक्षण : दि. ६ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी आराखडा पूर्ण; मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून
मतमोजणी प्रशिक्षण : दि. २ व ६ फेब्रुवारी २०२६
सुरक्षा व सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त
वैद्यकीय सुविधा व क्रेच सुविधा मतदान केंद्राजवळ
प्रति तालुका २ जलद कृती दले
वाहने : जीप – १३४, बस – ११६, मिनीबस – ०२
सखी मतदान केंद्र – ८ तालुक्यांत ८ ठिकाणी
आदर्श मतदान केंद्र – ८ तालुक्यांत ८ ठिकाणी
प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.







