सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठा सेनेचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी ‘मशाल’ चिन्हाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कणकवली तालुक्यातील हरकुळ बु. येथे आयोजित भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी सतीश सावंत यांच्यासोबत उबाठा सेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या वतीने सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बबलू सावंत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हरकुळ बु. सरपंच आनंद ठाकूर, भिरवडे सरपंच नितीन सावंत व बेनी डिसोझा, हरकुळ खुर्द सोसायटी व्हाइस चेअरमन नित्यानंद चिंदरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर, अर्चना घाडीगावकर, सोसायटी संचालक हनुमंत घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत, माजी सरपंच संदीप रासम, राजेंद्र ढवण, सहदेव पोकळे, नागवे माजी सरपंच बाळा सावंत, चंद्रकांत सावंत, अजय सावंत यांच्यासह हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील सुमारे १५० प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता. या प्रवेशामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.







