मालवण | प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मनापासून आभार मानले आहेत. यावेळी आमदार निलेश राणे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेले आश्वासक ‘व्हिजन’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सक्रिय सहभाग घेता येणार असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
श्री. कांदळगावकर यांनी सांगितले की, २०१६ ते २०२१ या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मालवण नगरपालिकेमार्फत अनेक विकासकामे मार्गी लावण्याची संधी मिळाली. मात्र, त्या काळातील दोन वर्षांचे कोरोना संकट तसेच शासनाकडून निधी उपलब्ध होण्यात आलेल्या अडचणींमुळे काही कामे रखडली. त्यानंतरची चार वर्षे नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण राहिली आहेत. आता स्वीकृत नगरसेवक म्हणून नूतन नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही प्रलंबित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करणे हेच माझे पहिले उद्दिष्ट असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेत कर्मचारी म्हणून २१ वर्षांची सेवा आणि त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. या दीर्घ अनुभवाचा उपयोग शहराच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक करण्यासाठी नक्कीच करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ज्या विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता शहरहितासाठी सदैव कार्यरत राहीन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, नव्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि शहराला नवे वैभव मिळवून देण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही श्री. कांदळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.





