मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड होणे ही केवळ एक प्रशासकीय घडामोड नाही, तर ती त्यांच्या आजपर्यंतच्या अखंड सेवाकार्याची, लोकांशी असलेल्या नाळेची आणि जनतेने दिलेल्या विश्वासाची ठाम पावती आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना पदापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे मानणाऱ्या दीपक पाटकर यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने हा सन्मान मानला जात आहे.
नगरसेवक म्हणून त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिले असता ‘लोकांसाठी झटणारा कार्यसम्राट’ अशी बिरुदावली जनतेनेच त्यांना दिली आहे. जनसामान्यांच्या साध्या-सोप्या प्रश्नांसाठीही तत्परतेने धाव घेणे, नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणे आणि ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे हीच दीपक पाटकर यांची खरी ओळख आहे. त्यामुळेच ते केवळ नगरसेवक न राहता मालवणच्या जनजीवनाचा एक विश्वासार्ह आधारस्तंभ बनले आहेत.
राजकीयदृष्ट्याही दीपक पाटकर यांनी मालवणमध्ये शिवसेनेचा पाया मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या प्रचारात शहरात मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. मालवण नगरपालिका निवडणूक प्रचारात प्रत्येक प्रभागात त्यांनी घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक आणि संघटन कौशल्य आज सर्वश्रुत आहे.
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि खासदार नारायण राणे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख असली, तरी केवळ राजकीय जवळीक नव्हे तर जनसामान्यांचा विश्वास हेच दीपक पाटकर यांचे खरे खणखणीत नाणे ठरले आहे. पद मिळवण्यासाठी नव्हे, तर लोकसेवेच्या माध्यमातून पद आपोआप चालून येते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
उपनगराध्यक्षपदाच्या माध्यमातून मालवण शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याची संधी दीपक पाटकर यांना मिळाली आहे. त्यांच्या अनुभवाचा, कामातील प्रामाणिकपणाचा आणि लोकांप्रती असलेल्या आस्थेचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मालवण उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दीपक पाटकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. जनतेचा विश्वास कायम ठेवत, मालवणच्या विकासासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक होवो, हीच सदिच्छा.






