मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून शाळांमधील शिक्षक व शिक्षण कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले आभा कार्ड सक्तीच्या कारणावरून दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आजारपणात स्वतःच्या खिशातून उपचाराचा खर्च करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढला असून, शासनाकडून मिळणाऱ्या वैद्यकीय परतफेडीपासून ते वंचित राहिले आहेत.
राज्यातील इतर ३५ जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन पद्धतीने वैद्यकीय बिले नियमितपणे मंजूर होत असताना, केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आभा कार्डची सक्ती का करण्यात येत आहे, असा थेट सवाल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने उपस्थित केला आहे. संघटनेच्या मते, ही सक्ती जिल्ह्याच्या भौगोलिक आणि वैद्यकीय सुविधांच्या वास्तवाशी सुसंगत नाही.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे आणि राज्य फेडरेशन प्रतिनिधी अशोक गीते यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रलंबित वैद्यकीय बिले तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. आजारपणात खर्च केलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, तसेच आभा कार्ड सक्तीमुळे निर्माण झालेला संभ्रम व अडचणी दूर कराव्यात, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. यासंदर्भात शिक्षण विभागाने विभागीय उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथून पुढील मार्गदर्शन मागवले असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकारने आभा कार्डच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत विविध आजारांवरील उपचार कव्हर केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, याचा अर्थ प्रत्यक्षात रुग्णालयात केवळ आभा कार्डवरच उपचार घेणे बंधनकारक असल्याचे समजले जात असून, अन्यथा पुढे वैद्यकीय बिले सादर करता येणार नाहीत, अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वास्तव मात्र यापेक्षा वेगळे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी केवळ कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मोजक्या तालुक्यांमध्येच आभा कार्डवर उपचार करणारी नोंदणीकृत रुग्णालये उपलब्ध आहेत. उर्वरित तालुके व ग्रामीण भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजारी पडल्यास प्रथम नोंदणीकृत रुग्णालय शोधणे, त्यासाठी लांबचा प्रवास करणे आणि त्या प्रवासासह उपचाराचा खर्च स्वतः उचलणे, अशी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. “उपचार हवे असतील तर प्रवास करा आणि जीवन वाचवायचे असेल तर खर्च स्वतः करा, हीच नवी धोरणात्मक दिशा आहे का?” असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे संघटनेने नमूद केले.
दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका दर्शवत विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून मागवलेल्या मार्गदर्शन पत्राची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिली आहे. या अनुषंगाने संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे भेट देऊन सविस्तर चर्चा करणार असून, प्रलंबित वैद्यकीय बिलांचा लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती संघाचे सचिव विजय मयेकर यांनी दिली आहे.






