मालवण बाजारपेठेत रात्री कचरा संकलन गाडी सुरू
मालवण, प्रतिनिधी : मालवण शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठ परिसरातील कचऱ्याची दीर्घकालीन समस्या अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी या समस्येबाबत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, मालवण नगरपालिकेकडून आता बाजारपेठेत रात्रीच्या वेळी कचरा संकलन गाडी सुरू करण्यात आली आहे.
मालवण हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, विलोभनीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि येथील खास मालवणी खाद्यसंस्कृतीमुळे दरमहा लाखो पर्यटक येथे येतात. मात्र, मच्छी मार्केट, बंदर जेटी आणि बाजारपेठ परिसरात दिवसभरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि पर्यटकांची गैरसोय होत होती. विशेषतः रात्रीच्या वेळेस कचरा टाकण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने ही समस्या अधिक तीव्र होत होती.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सौरभ ताम्हणकर यांनी १५ जानेवारी २०२४ रोजी मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले होते. या निवेदनात केवळ सकाळी स्वच्छता मोहीम राबवून समस्या सुटणार नसल्याचे स्पष्ट करत, ठोस आणि नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली होती. यामध्ये रात्री १० नंतर बाजारपेठेत कचरा संकलन गाडी सुरू करणे, कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच वारंवार घाण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.
या निवेदनाची दखल घेत मालवण नगरपालिकेने अखेर सकारात्मक निर्णय घेत रात्रीच्या वेळी कचरा संकलन गाडी सुरू केली आहे. ही गाडी आता रात्री १० वाजल्यानंतर बाजारपेठ परिसरात फिरणार असून, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व स्थानिक नागरिक थेट या गाडीत कचरा देऊ शकणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण कमी होऊन मच्छी मार्केट व आसपासच्या परिसरातील दुर्गंधी व अस्वच्छतेला आळा बसण्यास मदत होणार आहे.
“केवळ स्वच्छता मोहिमा राबविणे पुरेसे नसून, त्यामागे ठोस नियोजन आणि शिस्त आवश्यक आहे,” असे मत सौरभ ताम्हणकर यांनी यापूर्वीच व्यक्त केले होते. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण भूमिकेमुळे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या निर्णयासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे, मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच भारतीय जनता पार्टी गटनेत्या अन्वेषा आचरेकर यांचे सौरभ ताम्हणकर यांनी मनापासून आभार मानले आहेत. तसेच महायुती सरकारकडून अशाच प्रकारे विकासकामांचा धडाका सुरू राहावा, अशी अपेक्षा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे मालवणचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होणार असून, पर्यटकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी मालवणचा अनुभव घेता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.







