मालवण | प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांपैकी अत्यंत मानाचा मानला जाणारा ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी ही अधिकृत घोषणा केली.
जिल्हा व्यापारी महासंघातर्फे दरवर्षी कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, कै. माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार, सेवाव्रती श्री. बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा-उद्यमी पुरस्कार, कै. बी. एस. तथा भाईसाहेब भोगले स्मृती ग्रामीण नवउद्यमी पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आदी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांसह इतरही पुरस्कारांची घोषणा टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचेही नितीन वाळके यांनी स्पष्ट केले.
मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर हे गेल्या २५ वर्षांपासून अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. २०००, २००८, २०१६ आणि २०२४ या चार व्यापारी मेळाव्यांचे सलग व यशस्वी आयोजन करून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. कुशल संघटक म्हणून ओळख असलेल्या नेरूरकर यांची सर्वांना सोबत घेऊन काम करून घेण्याची शैली व्यापारी वर्गात विशेष कौतुकास्पद मानली जाते.
संपूर्ण जिल्ह्यात केवळ मालवणमध्येच नव्या, युवा व महिला व्यापाऱ्यांना व्यापारी संघटनेच्या कामात सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. व्यापारी वर्ष अभ्यास सहल, व्यापारी एकता वनभोजन, युवा व्यापाऱ्यांची एकदिवसीय सहल, नारळी पौर्णिमा, दीपावली उत्सव तसेच विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन वर्षभर सातत्याने करण्यात येते. सभासद नोंदणी, नियमित बैठका आणि प्रत्येक एकता मेळाव्यात मालवणच्या व्यापाऱ्यांची विक्रमी उपस्थिती यामध्येही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे उमेश नेरूरकर यांना ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून, या निवडीबद्दल व्यापारी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





