मालवण | प्रतिनिधी – मालवण शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन काम करा. मालवण पर्यटन केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष भर द्या; भंडारी समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांनी केले.
सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण व भंडारी ज्ञातीबांधवांच्या वतीने मालवणच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार भरड येथील लीलांजली सभागृहात पार पडला. भाई गोवेकर यांच्या हस्ते मुख्य सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मालवणकर, उद्योजक चंद्रशेखर मोर्वेकर, भाई सारंग, निलेश मांजरेकर, अविनाश मालवणकर, जयप्रकाश परुळेकर, निखिल वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर, अश्विनी कांदळकर व भाग्यश्री मयेकर यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या वतीने डास निर्मूलन, वाहतूक नियोजन, कचरा व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या सुविधा या शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच मालवण एलआयसी शाखेच्या शाखाधिकारी श्रीमती सतेजा बोवलेकर यांच्या नेतृत्वाखाली शाखेने मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मालवण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुदेश मयेकर यांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी पतपेढीवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सुमित मसुरकर यांनाही गौरविण्यात आले.
नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर म्हणाल्या, “समाजाने केलेल्या या सन्मानामुळे मी भारावून गेले आहे. समाजाला गरज भासेल तेव्हा मी आणि माझे सहकारी पक्षभेद बाजूला ठेवून समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्न मयेकर यांनी केले तर आभार सुनील नाईक यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रदीप वेंगुर्लेकर, राजेंद्र आंबेरकर, पंकज पेडणेकर, भाऊ साळगावकर, अजित गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, देवदत्त हडकर, सागर हडकर, सचिन गवंडे, अशोक मयेकर, चिमाजी मसुरकर, बाळा सोन्सुरकर, पप्या कद्रेकर, मिलिंद झाड, विनोद बिले यांच्यासह बहुसंख्य भंडारी बांधव व भगिनी उपस्थित होते.





